बातम्या

रिक्षाचालकांना आर्थिक मदत करा – शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे

‘लॉकडाऊन’मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या रिक्षाचालकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी बदलापूर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत आपण विचार करून निर्णय घ्याल, अशी खात्री आहे. नाहीतर राज्यातील रिक्षाचालकांवर शेतकऱ्यासारखी आत्महत्या करण्याची वेळ येईल, असेही म्हात्रे यांचे म्हणणे आहे.
करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र या लॉकडाऊनचा मोठा फटका हातावर पोट असणाऱ्यांना बसला आहे. २१ दिवसांचा असलेल्या या लॉकडाऊनमध्ये रिक्षाचालकही होरपळून निघाला असल्याचे वामन म्हात्रे यांचे म्हणणे आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून रिक्षाचालकांचा धंदा बंद असून रिक्षाचालकांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यांची बिकट परिस्थिती निर्माण झाली असून रिक्षाचालक आणि त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढू लागली आहे. प्रत्येक रिक्षाचालकाचे चार ते पाच जणांचे कुटुंब असून त्यांची उपासमार होऊ लागली आहे. मात्र रिक्षाचालकांकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही. त्यामुळे सामान्य रिक्षाचालकांनी मदत कोणाकडे मागायची, हा प्रश्नही म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.
समाधानाची बाब म्हणजे कर्जाच्या हप्त्याची मुदत तीन महिने पुढे ढकलली आहे. मात्र, नंतरही हप्त्याची चिंता असणारच आहे. रोजचा दैनंदिन खर्च तसेच आजारपणाचा खर्च काही थांबत नाही. परंतु, या खर्चासाठीदेखील रिक्षाचालकांकडे पैसे नाहीत. या गोष्टीकडेदेखील पवार यांनी लक्ष वेधले आहे. रिक्षाचालकांच्या घरात कोणी अचानक आजारी पडला तर करायचे काय? सरकारने सर्व वर्गातील कष्टकरी जनतेला मदत जाहीर केली. परंतु यामध्ये रिक्षाचालकांचा उल्लेख कोठेच नाही. हा वर्ग दुर्लक्षित झाल्याची खंत व्यक्त करत हा रिक्षा चालकांवर एकप्रकारचा अन्यायच असल्याचे पवार यांचे म्हणणे आहे. रिक्षाचालकांना तातडीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत ते बँकेत जाहीर करावी तसेच इन्शुरन्स मध्ये सुद्धा ५०% सवलत मिळावी अशी मागणी म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सदर पत्र मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाले असून पुढील कारवाई साठी पाठविले आहे असे उत्तर मुख्यमंत्री कार्यालयातून वामन म्हात्रे यांना मिळाले आहे.

About the author

Todays Live Team

Add Comment

Click here to post a comment

Featured