बातम्या

कोरोना : ऑक्सिजनची निर्मिती कशी होते? ऑक्सिजनसाठी महाराष्ट्राची लढाई, काय आहेत अडचणी आणि उपाय?

ऑक्सिजनला मराठीत प्राणवायू का म्हणतात, ते वेगळं सांगायची गरज नाही. पण कोरोना विषाणूच्या साथीनं प्राणवायू किती महत्त्वाचा आहे पुन्हा आठवण करून दिली आहे.

A fundamental and sustainable response to COVID-19: improving local oxygen systems | UNICEF Supply Division

रुग्णांना ऑक्सिजनचा नियमित पुरवठा करणं, हे सध्या भारतात आरोग्य व्यवस्थेसमोरचं मोठं आव्हान बनलं आहे. विशेषतः महाराष्ट्रात, ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याविषयी चिंता व्यक्त केली आणि मंगळवारी फेसबुकद्वारा जनतेशी संवाद साधताना आपण केंद्र सरकारला हवाई मार्गे ऑक्सिजन पुरवठ्याविषयी विनंती केली असल्याचं सांगितलं.

पण परिस्थिती नेमकी किती दाहक आहे? ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये काय अडचणी असतात आणि मुळात ऑक्सिजनचा कोव्हिडच्या रुग्णांना काय फायदा होतो?

ऑक्सिजनची निर्मिती कशी होते?

Global COVID-19 cases pass 100,000 mark | CIDRAP

हवेत मुबलक प्रमाणात (जवळपास 21 टक्के) ऑक्सिजन असताना, त्याची निर्मिती कशी केली जाते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यामागची वैज्ञानिक प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची आहे.

पण शास्त्रीय संज्ञा बाजूला ठेवून अगदी थोडक्यात सांगायचं, तर दबावाखाली द्रवात रुपांतर केलं जातं. अशा द्रवीकृत हवेतले घटक वेगळे करणं सोपं जातं. त्यातून शुद्ध आणि द्रवरुपातला ऑक्सिजन किंवा नायट्रोजन मिळतो.

हा द्रवीकृत म्हणजे लिक्विफाईड ऑक्सिजन रंगानं फिकट निळा असतो आणि अतिशय थंड असतो. त्याचं तापमान उणे 183 अंश सेल्सियस एवढं कमी असतं. अशा अतिथंड वायूंना ‘क्रायोजेनिक गॅसेस’ म्हटलं जातं.
हे तापमान कायम राखणं हे आव्हान असलं, तरी द्रवरुपात अशा वायूची साठवणूक आणि वाहतूक करणं सोयीचं असतं. त्यासाठी हा द्रवीकृत ऑक्सिजन सिलिंडरमध्ये दबावाखाली भरला जातो.

भारतात हे काम करणारे 500 कारखाने आहेत. पण त्यातून निर्माण होणारा सगळाच ऑक्सिजन वैद्यकीय उपचारांसाठी वापरला जात नाही.

कोव्हिडची साथ येण्यापूर्वी भारतात तयार होणाऱ्या ऑक्सिजनपैकी 15 टक्के ऑक्सिजनच वैद्यकीय उपचारांत वापरला जायचा. बाकीचा ऑक्सिजन तेलशुद्धिकरण प्रकल्पांमध्ये किंवा लोहउद्योग, कार निर्मिती अशा क्षेत्रांमध्ये ब्लास्ट फर्नेस म्हणजे भट्टी चालवण्यासाठी वापरला जायचा.

गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात उद्योग बंद होते त्यामुळे रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा होत राहिला. पण लॉकडाऊन उठल्यावर नंतर उद्योगांकडून ऑक्सिजनची मागणी वाढत गेली. तरीही प्राधान्य रुग्णालयांना दिलं जातंय.

सध्या देशात प्राथमिक अंदाजानुसार निम्म्याहून अधिक ऑक्सिजन वैद्यकीय उपचारांसाठी वापरला जातो आहे.

आता मागणी वाढल्यावर ऑक्सिजनचे नवे कारखाने असे लगेच उभे करणंही शक्य नाही. शिवाय केवळ ऑक्सिजनची निर्मिती वाढवून चालत नाही, त्याची ने-आण कशी होणार हाही प्रश्न आहे.